भंडारा | प्रतिनिधी
भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात महत्त्वाची नोंद झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी पक्षाने जैन यांच्यावर विश्वास दाखवला आहे. या निर्णयामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्याला संसदेत तिसरा प्रतिनिधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजेंद्र जैन हे गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते खासदार प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2004 ते 2016 या कालावधीत भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद सदस्य (एमएलसी) म्हणून काम केले आहे. तसेच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
राज्यसभा उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असताना अखेर पक्षाच्या कोअर कमिटीने राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विदर्भातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रतिनिधित्व मिळावे या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, राजेंद्र जैन यांच्या निवडीमुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकते. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्र आणि ग्रामीण विकासातील त्यांचा अनुभव राज्यसभेत जिल्ह्याच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यास उपयोगी ठरेल. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखालील विदर्भातील राजकीय समीकरणांमध्येही या निर्णयामुळे नव्या घडामोडींना चालना मिळण्याची शक्यता आहे.
राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीनंतर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.