भंडारा : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा रोजगार मेळावा दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत कार्यालयाच्या परिसरात यशस्वीपणे पार पडला.
या रोजगार मेळाव्यात 5 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला असून त्यांच्याकडील सुमारे 50 रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. या उपक्रमासाठी एकूण 227 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये 138 पुरुष व 89 महिला उमेदवारांचा समावेश होता. यापैकी 160 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावून मुलाखती दिल्या, तर 67 उमेदवारांनी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी केली होती. मुलाखतीनंतर 18 उमेदवारांची प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आली आहे.
उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुधाकर झळके, सहायक आयुक्त (जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा) उपस्थित होते. यावेळी अजबराव चिचामे (माजी कक्ष अधिकारी), किशोर कुमार कुंभरे (CEO, पशुसंवर्धन विभाग), शशिकांत भोयर (लोकशाही वार्ताहार), वि. पांडव (कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन अधिकारी), आशालता वाल्दे (कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डॉ. सुधाकर झळके यांनी सांगितले की, युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात यासाठी असे रोजगार मेळावे सातत्याने आयोजित केले जात आहेत. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध असून उमेदवारांनी सुरुवातीच्या मानधनाकडे दुर्लक्ष न करता मेहनत, कौशल्य आणि चिकाटीच्या बळावर यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. ही संधी युवकांसाठी सुवर्णसंधी असून तिचा लाभ घेण्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अमीत मलोडे यांनी केले. रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

