भंडारा : नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व (NNTR) मध्ये पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी 1 ते 4 नवीन गेट्स सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागाच्या विकासालाही गती मिळणार आहे.
साकोली येथील नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्वमध्ये पर्यटन वाढीसाठी टप्प्याटप्प्याने पावले उचलली जात आहेत. नव्या गेट्समुळे पर्यटकांना जंगलातील अधिक भाग पाहण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे, येत्या काळात येथे नाईट सफारीची सुविधाही उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे, ज्यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होणार आहे.
72 अँटी-पोचिंग कॅम्प, 144 सुरक्षा कर्मचारी
वन्यजीव संरक्षणासाठी येथे 72 अँटी-पोचिंग कॅम्प कार्यरत आहेत. प्रत्येक कॅम्पमध्ये 2 मजूर कार्यरत असून एकूण 144 लोकांना रोजगार मिळत आहे. याशिवाय 68 जीप्स पर्यटकांसाठी उपलब्ध असून प्रत्येक जीपवर चालक आणि गाईड नियुक्त केले आहेत.
टाटा समूहाची पुढाकार
नागझिरा-नवेगाव प्रकल्पाच्या विकासासाठी टाटा समूहाने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सुमारे 60-70 गावांचा समावेश करून स्थानिकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. यात हस्तकला, शिवणकाम, बांबू उत्पादन, पारंपरिक कला आणि इतर लघुउद्योगांचा समावेश आहे.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी
या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. जंगल सफारी, गाईड सेवा, वाहन चालक, हस्तकला विक्री आणि पर्यटनाशी संबंधित इतर व्यवसायातून उत्पन्न वाढत आहे. महिलांसाठीही स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. काही महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंमधून चांगला नफा मिळवत आहेत.
150 कोर झोनचा विस्तार
नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्वचा कोर झोन सुमारे 150 चौ. किमी पर्यंत विस्तारलेला आहे. या विस्तृत जंगल परिसरामुळे पर्यटकांना वन्यजीवांचे जवळून दर्शन घेण्याची संधी मिळते.
पर्यटनासह ग्रामीण विकासाला गती
नवीन गेट्स, नाईट सफारी आणि कौशल्य विकास उपक्रमांमुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होणार आहे.

