भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील तलाव वॉर्ड परिसरात शेतात लागलेली भीषण आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साकोली येथील गट क्रमांक ५२८ मधील शेतकरी रामदास गोविंद निमकर (वय ६५) यांच्या शेतात मक्याचे पीक लावण्यात आले होते. बुधवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अचानक शेतामध्ये आग लागल्याचे दिसून आले.
आग लागल्याचे लक्षात येताच रामदास निमकर यांनी स्वतःच आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केल्याने ते आगीच्या विळख्यात अडकले. आगीच्या ज्वाळांमध्ये गंभीर भाजल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, शेतातून धूर निघताना पाहून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. आगीत मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात जळून गेले असून शेजारील शेतालाही फटका बसल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच साकोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करीत आहेत.
स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत शासनाने मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी तसेच आगीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.