भंडारा जिल्ह्यात डिजिटल जनगणना मोहिमेचा शुभारंभ
भंडारा : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल जनगणना मोहिमेची आजपासून सुरुवात झाली असून भंडारा जिल्ह्यात या मोहिमेसाठी तब्बल ३१०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कर्मचारी घराघरात जाऊन नागरिकांची माहिती संकलित करणार आहेत. प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवरही प्रशासनाने जनगणना यशस्वी करण्यासाठी व्यापक तयारी केली आहे.
पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जनगणना
यंदाची जनगणना पूर्णतः डिजिटल माध्यमातून केली जाणार आहे. नागरिकांना “सेल्फ एन्युमरेशन” पोर्टलद्वारे स्वतःची माहिती ऑनलाइन नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. १५ मेपासून सुरू झालेली ही प्रक्रिया पुढील काही आठवडे सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जाणार आहे.
३३ प्रश्नांद्वारे नागरिकांची माहिती संकलित
जनगणना प्रक्रियेदरम्यान नागरिकांना सुमारे ३३ महत्त्वाचे प्रश्न विचारले जाणार आहेत. यात घराची स्थिती, शौचालय, पिण्याचे पाणी, वीज, मोबाईल, इंटरनेट, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन, शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित माहितीचा समावेश आहे. या आकडेवारीच्या आधारे भविष्यातील शासकीय योजनांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
कागदपत्र दाखविण्याची सक्ती नाही
जनगणना करताना नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही कागदपत्र दाखविण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून ती केवळ शासकीय कामासाठीच वापरण्यात येईल.
उष्णतेत प्रगणकांची मोठी कसरत
मे महिन्यातील तीव्र उष्णतेत ही मोहीम राबविणे कर्मचारी आणि प्रगणकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असतानाही सुमारे २ हजार प्रगणक आणि ३२५ पर्यवेक्षक जिल्हाभरात सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.