तुमसर-रामटेक रेल्वे प्रकल्पावर जनप्रतिनिधींची उदासीनता; पालकमंत्र्यांकडे निवेदन सादर..
भंडारा जिल्ह्यातील तुमसर ते रामटेक दरम्यान प्रस्तावित रेल्वे लाईन प्रकल्प गेल्या तब्बल ९ वर्षांपासून रखडलेला असून, या प्रकल्पाच्या विलंबामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारच्या अनदेखीमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही, अशी तीव्र भावना स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात भारतीय रेल्वे प्रवासी केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे तातडीने रेल्वे लाईनचे काम सुरू करून प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तुमसर ते रामटेक रेल्वे लाईनसाठी आवश्यक सर्वेक्षण व प्राथमिक प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. सुमारे 46.50 किमी लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी अंदाजे 548.01 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या प्रकल्पाला आरओआर (7.60%) मान्यता मिळाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, निधीअभावी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प रखडल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक जनप्रतिनिधींकडूनही या प्रकल्पासाठी अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र ती पूर्ण होताना दिसत नाही.
दरम्यान, हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास तुमसर शहराला रेल्वे स्टेशनचा दर्जा मिळणार असून, व्यापार आणि प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल. तसेच, परिसरातील पर्यटन स्थळांना चालना मिळून आर्थिक विकासालाही गती मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रखडलेला प्रकल्प पूर्ण करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

