नागपूर / मुंबई | प्रतिनिधी (VBN News)
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये वाहनचालकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाने वाहतूक पोलिसांच्या वर्तनावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना काही ठिकाणी वाहनचालकांना अनावश्यकपणे अडवणे, दबाव टाकणे किंवा दादागिरी केल्याच्या तक्रारी वाढल्याने प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच वाहतूक विभागाला महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या निर्देशांनुसार वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना नागरिकांशी नम्रतेने व कायद्याच्या चौकटीत राहून वर्तन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, अनेक वाहनचालकांकडून अशीही तक्रार समोर आली होती की काही ठिकाणी वाहतूक पोलीस वाहन अडवून “आधी तुमचा जुना दंड भरा, नाहीतर वाहन जप्त केले जाईल” अशी धमकी देतात. या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. आता अशा प्रकारच्या दबाव टाकणाऱ्या कारवायांवरही लगाम बसणार असल्याचे संकेत शासनाच्या या आदेशातून मिळत आहेत.

राज्याचे परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या सर्व तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असले तरी नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, वाहन अडवताना किंवा दंडात्मक कारवाई करताना सर्व प्रक्रिया नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, वाहनचालकांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवावे आणि कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा धमकी देणे टाळावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, जर कोणत्याही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून गैरवर्तन, दादागिरी किंवा नियमबाह्य कारवाई झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतूक नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असताना नागरिकांशी सन्मानपूर्वक वागणूक दिली जावी, अशी अपेक्षा वाहनचालक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

